ध्रुविता चव्हाणचे राष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान यश; १३ व्या वर्षी १२ क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी

edunewspune.com
न्यूज नेटवर्कपुणे :
रुपीनगर परिसरात राहणारी ध्रुविता चव्हाण ही अवघ्या १३ व्या वर्षी क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडत आहे. जिद्द, चिकाटी, समर्पण आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर ध्रुविताने तब्बल १२ वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, धैर्य आणि लढाऊ वृत्तीने प्रेरित होऊन ती सातत्याने क्रीडाक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहे.
ध्रुविताने विविध क्रीडाप्रकारांमध्ये तालुका, जिल्हा परिषद (Z.P), विभागीय, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धांमध्ये सहभाग घेत अनेक पदके मिळवली आहेत.जिल्हा परिषद (Z.P) स्तरावर तिने कुराश, युनिफाईट आणि शस्त्रांगण मार्शल आर्ट्स या क्रीडा प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. बेल्ट रेसलिंग, जूडो, आष्टेदू आखाडा, शूटिंग बॉल, लंगडी आणि टग ऑफ वॉर या प्रकारांत द्वितीय क्रमांक मिळवला, तर थाई बॉक्सिंग आणि डॉजबॉलमध्ये तृतीय क्रमांक मिळवत आपली ताकद दाखवून दिली.

विभागीय / झोनल स्तरावर युनिफाईटमध्ये प्रथम क्रमांक आणि कुराशमध्ये तृतीय क्रमांक मिळवला.राज्य स्तरावर युनिफाईटमध्ये प्रथम क्रमांक मिळवत तिने आपली क्षमता सिद्ध केली, तर राष्ट्रीय स्तरावरही युनिफाईटमध्ये प्रथम क्रमांक मिळवून मोठे यश संपादन केले.
याशिवाय ध्रुविताने अनेक सांघिक क्रीडा प्रकारांमध्येही सहभाग घेतला असून रग्बी, कॅरम, शूटिंग बॉल, टेनिक्वेट, लंगडी, टग ऑफ वॉर, कराटे आणि डॉजबॉल अशा खेळांमध्येही तिने आपली प्रतिभा दाखवून दिली आहे.
ध्रुविता ही शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण घेत असून तिला तब्बल ८ प्रकारची पारंपरिक शस्त्रे चालवण्याचे कौशल्य अवगत आहे. “शारीरिक ताकद लढाई जिंकते, पण मानसिक दृढता विजयाला अजरामर करते,” या विचाराचे ती जणू मूर्तिमंत उदाहरण ठरली आहे.
ध्रुविता मोरेवस्ती येथील श्रीगणेश व्यायाम मंडळात नियमित सराव करत असून तिचे प्रशिक्षक प्रफुल्ल प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली ती क्रीडाक्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. ती सेंट पिटर्स स्कूलची विद्यार्थिनी आहे.तसेच सिद्धार्थ फाउंडेशन, पुणे या संस्थेची विद्यार्थिनी असलेल्या ध्रुविताने क्रीडाक्षेत्राबरोबरच बौद्धिक क्षेत्रातही यश मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय ऑनलाइन अबॅकस स्पर्धेत “Champion of Champion” हा मानाचा किताब जिंकून तिने देशाचे नाव उंचावले आहे.परिवार, प्रशिक्षक आणि संस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळे ध्रुविताचा क्रीडाप्रवास अधिक उज्ज्वल होत असून तिच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून तिचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.